
- आरोग्य विभागाने नमुने केले गोळा ः अतिदक्षता विभागात उपचार सुरू
अमरावती, 13 जुलै (हिं.स.)।
तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत भागात संशयित लेप्टोस्पायरोसीस आजाराचा रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाने आवश्यक ते नमुने गोळा केले असून रुग्णावर सध्या नागपूर एम्स अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. परतवाडा शहरालगतच्या कांडली ग्रामपंचायत भागात पाहुणा म्हणून आलेल्या एका मुलाला ताप चढ-उतार असल्याने नातेवाइकांनी स्थानिक दवाखान्यात नेले. नंतर अमरावती व शेवटी नागपूर एम्सला दाखल करण्यात आले. तपासणीअंती त्याला लेप्टोस्पायरोसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र रुग्ण ज्या परिसरात काही दिवस राहिला त्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य व तेथील गटारही बऱ्याच महिन्यांपासून असल्याने परिसरात दुर्गंधी राहते. नालीतील सांडपाणी मार्गांवर नेहमी वाहत राहते. हे चित्र अनेक वर्षांपासून असताना संबंधित विभागाला ठोस उपाययोजना करण्याची गरज वाटली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये येथे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली.
रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग ॲक्टिव्ह झाला असून नुकताच त्यांनी आवश्यक ते नमुने गोळा केले आहेत. मात्र संबंधित ग्रामपंचायत विभाग कधी जागा होईल व ठोस उपाययोजना राबवेल? असा प्रश्न परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
प्राथमिक स्तरावर तपासणी सुरू आहे. रक्त व पाणी नमुने घेतले आहेत. पेशंटच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांसाठी प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत. चाचणी रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार. -डॉ. लेखिका गाडबैल, तालुका वैद्यकीय अधिकारी.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी