
नाशिक, 13 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या नाशिक टीसीएस कंपनीतील सहकाऱ्याच्या कथित धार्मिक छळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने कायदा-सुव्यवस्था आणि साक्षीदारांच्या सुरक्षेचा विचार करून संशयितांवर काही कठोर अटी घातल्या आहेत.
या प्रकरणातील संशयित रझा रफिक मेमन, तौसिफ बिलाल अत्तार आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांना न्यायालयाने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मिळाल्यानंतरही त्यांना नाशिक शहरात वास्तव्यास राहता येणार नाही तसेच शहरात मुक्तपणे प्रवेश करता येणार नाही.टीसीएस कंपनीतील सहकाऱ्याचा कथित धार्मिक छळ केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करत गुन्ह्याचे गांभीर्य, तसेच साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून विशेष अटींसह जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांनी या प्रकरणात आदेश देताना संशयितांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, जामीन मिळाला असला तरी संशयितांना नाशिक शहराबाहेर राहावे लागणार आहे.
न्यायालयाने घातलेल्या प्रमुख अटी अशा...
नाशिक शहरात प्रवेशास बंदी , नाशिक शहरात मुक्तपणे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मुंबई नाका पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार.
न्यायालयीन तारखेला हजर राहण्यासाठी नाशिक शहरात येण्याची परवानगी असेल.
न्यायालयीन काम किंवा पोलीस ठाण्यातील हजेरी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ नाशिक शहराबाहेर जावे लागणार.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV