
परभणी,13 जुलै (हिं.स.) : भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (१३ जुलै) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना यासंदर्भातील निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नाझिया इलाही खान यांनी विविध जाहीर सभा तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या व्हिडिओंच्या माध्यमातून इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून देशभरात नाराजी निर्माण झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्रासह देशातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून काही मुस्लिम संघटनांनी आंदोलन केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समाजामध्ये धार्मिक सलोखा, बंधुभाव आणि शांतता कायम राखण्यासाठी धर्म, जात किंवा समाजाविरोधात द्वेषपूर्ण व प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कोणत्याही धर्माबद्दल अवमानकारक भाष्य केल्याने सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचू शकते, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांसारख्या थोर महापुरुषांविषयी सामाजिक माध्यमे किंवा सार्वजनिक व्यासपीठांवरून होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांनाही प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
नाझिया इलाही खान यांच्या कथित वक्तव्यांची सखोल चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी परभणी येथील नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis