
बीड, 13 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई शहरातील तथागत चौकात आज सोमवारी पहाटे एका शिक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विवेक करपे असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भर चौकात मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, हा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप उघड झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. पोलिसांना तपासादरम्यान मृताच्या शर्टाच्या खिशात एका खाजगी बसच्या प्रवासाचे तिकीट आढळून आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात असावा अशी शंका वर्तविण्यात येत असली, तरी वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल.
अंबाजोगाई शहर पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. तथागत चौक आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने लवकरच या घटनेमागील सत्य आणि मृत्यूचे नेमके कारण जनतेसमोर येईल अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis