
बीड, 13 जुलै (हिं.स.) :जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पाटोदा येथे पीएचएन टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील पीएछएन टेक्नोलॅबला भेट देऊन तेथील आधुनिक शिक्षण सुविधा, तंत्रज्ञानाधारित उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाटोदा नगरपंचायत हद्दीत सुरू असलेल्या उद्यान विकासकामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता, नियोजन आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
तसेच पाटोदा नगरपंचायत येथील एसआयआर कॅम्पला भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. नागरिकांना अधिक प्रभावी, सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis