लोकसहभागातून अमडापूर स्मशानभूमीचा कायापालट
मुख्य रस्त्याच्या मंजुरीची खासदार अमर काळेंकडे मागणी अमरावती, १३ जुलै (हिं.स.) : अमडापूर येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधा उभारण्याचे काम भागवत सप्ताह समितीच्या पुढाकारातून व लोकसहभागातून सुरू असून, या उपक्रमाची खासदार अमर काळे यां
लोकसहभागातून अमडापूर स्मशानभूमीचा कायापालट


मुख्य रस्त्याच्या मंजुरीची खासदार अमर काळेंकडे मागणी

अमरावती, १३ जुलै (हिं.स.) : अमडापूर येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आणि मूलभूत सुविधा उभारण्याचे काम भागवत सप्ताह समितीच्या पुढाकारातून व लोकसहभागातून सुरू असून, या उपक्रमाची खासदार अमर काळे यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या मंजुरीची मागणी करणारे निवेदन त्यांच्याकडे सादर केले.

स्मशानभूमीत यापूर्वी पाणी व विजेची सुविधा नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून निधी उभारून पाण्याची पाइपलाइन टाकली, पाण्याची टाकी उभारली तसेच परिसरात वीज व प्रकाशयोजनेची सुविधा उपलब्ध करून दिली.

दशक्रिया विधीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने स्मशानभूमी परिसरात भगवान शंकराची भव्य मूर्ती उभारण्याचे कामही सुरू आहे. गावातील एका लेकीने ही मूर्ती दान दिली असून, तिच्या प्रतिष्ठापनेसाठी आवश्यक ओट्याचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. तसेच अनेक नागरिकांनी परिसरात बसण्यासाठी बाकांचे दान देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

दरम्यान, गावातील तरुणांनी सुरू केलेल्या 'एक दिवस गावासाठी' या श्रमदान अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दर रविवारी युवक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करत असून, ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी होऊन त्यांना प्रोत्साहन देत आहेत.

खासदार अमर काळे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून भागवत सप्ताह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, श्रमदान करणारे युवक आणि लोकसहभागाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था निदर्शनास आणून नवीन रस्ता मंजूर करण्याची मागणी केली. त्यावर हा प्रस्ताव लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन खासदार काळे यांनी दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

याप्रसंगी भागवत सप्ताह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande