
लातूर, 13 जुलै (हिं.स.)। शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत सातत्याने संघर्ष करून त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेणारे एकमेव नेते म्हणजे आमदार विक्रम काळे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी लातूर येथे केले. लातूर येथील दयानंद सभागृहात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री संजय बनसोडे, नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले की, विक्रम काळे हे शिक्षकांचे एक लढवय्ये नेते असून त्यांनी जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सत्कार हा कौतुकास्पद उपक्रम असून, येणाऱ्या काळात त्यांना वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशा शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमदार विक्रम काळे आणि माझा स्नेह जुना आहे.
लोकप्रतिनिधींकडून कामे कशी करून घ्यायची, हे त्यांना उत्तम उमजले आहे. ते केवळ शिक्षकांचेच नाही, तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ४८ तालुक्यांत फिरून ते सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा वाढदिवस अधिवेशनाच्या काळात असतानाही, त्यांनी अधिवेशनाला गैरहजर न राहता सभागृहात शिक्षकांचे प्रश्न मांडले, यावरून त्यांची सजग लोकप्रतिनिधी म्हणून ओळख पटते.
नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांनी विक्रम काळे यांना अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व असे संबोधले, तर माजी मंत्री संजय बनसोडे यांनीही कार्यक्रमाप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार विक्रम काळे यांनी केले. ते म्हणाले की, वाढदिवस हा केवळ नाममात्र असतो. त्यानिमित्ताने माझ्या सहकाऱ्यांनी अन्नदान, रक्तदान आणि शालेय साहित्य वाटपासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. शिक्षकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी मी यापुढेही विधान परिषदेत आणि बाहेरही लढण्यासाठी कटिबद्ध राहीन. या सोहळ्यात १०० टक्के गुण मिळवणाऱ्या ९६ विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मराठवाड्यातील विविध शिक्षक आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis