पावसाचा खंड, सव्वालाख हेक्टर क्षेत्र नापेर
- कापसाचा टक्का वाढला, सोयाबीनचा घटला अमरावती, 13 जुलै (हिं.स.) शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाचा टक्का वाढविला आहे. एकूण सरासरी पेरणीक्षेत्रापैकी ३५ टक्के क्षेत्र कापसाखाली आले आहे. त्या तुलनेत सोयाबीनचा टक्का लक्षणीय प्रमाणात घटल्याचे द
पावसाचा खंड, सव्वालाख हेक्टर क्षेत्र नापेर


- कापसाचा टक्का वाढला, सोयाबीनचा घटला

अमरावती, 13 जुलै (हिं.स.)

शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाचा टक्का वाढविला आहे. एकूण सरासरी पेरणीक्षेत्रापैकी ३५ टक्के क्षेत्र कापसाखाली आले आहे. त्या तुलनेत सोयाबीनचा टक्का लक्षणीय प्रमाणात घटल्याचे दिसून येत असून तूर व मक्याच्याही पेरणीचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ टक्के क्षेत्रातील पेरण्या आटोपल्या असून पावसाचा आगामी अंदाज बघता पेरण्यांना खीळ बसण्याची शक्यता वाढली आहे.

जिल्ह्यात सरासरी ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून आतापर्यंत ५ लाख ५७ हजार ७१ हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. अद्याप सव्वालाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे. हवामान खात्याने ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर या हंगामात पावसाचे स्वरूप खंडित व विखूरलेल्या प्रमाणात राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. कोरडवाहू पट्ट्यात कापसासह सोयाबीन व तूर ही मुख्य पिके घेतली जातात. सोयाबीन कमी दिवसांचे व संवेदनशील पीक असल्याने या पिकाच्या पेरणीला लवकर प्रारंभ होतो. यंदा मात्र त्यामध्ये घट झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. शेतकऱ्यांनी कापसाला प्राधान्य देत टक्का वाढविला आहे. २ लाख ४० हजार ७१४ हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली आहे, तर सोयाबीनची पेरणी १ लाख ७७ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रात आहे. गतवर्षी अडीच लाख हेक्टरच्या जवळपास सोयाबीनचे क्षेत्र होते. तूर व मक्याच्या पेरणीतही घट झाली आहे. तुरीचे पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून मक्याचे क्षेत्र मात्र गतवेळपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. विद्यमान स्थितीत तुरीखाली ९४ हजार १४४ तर मक्याखाली ३५ हजार ३९ हेक्टर क्षेत्र आले आहे. गतवेळी मका ४५ हजार हेक्टर क्षेत्रात होता. पेरणीचा काळ समोर सरकत असताना पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. आगामी सप्ताहभर पावसाचा खंड राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शिल्लक क्षेत्रातील पेरण्या प्रभावीत होऊन पेरलेल्या बियाण्यांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील पेरणीची स्थिती (हेक्टर)

एकूण सरासरी क्षेत्र ः ६, ८२, ९९२

प्रत्यक्ष पेरणी ः ५, ५७, ०७१

सरासरी ः ८२ टक्के

कापूस ः २, ४०, ७१४

सोयाबीन ः १, ७७, ९९७

तूर ः ९४, १४४

मका ः ३५, ०३९

मूग ः २४३

उडीद ः २८४

ज्वारी ः १४४६

धान ः ५७८४

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande