मंगरूळमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित, युवकांचा मध्यरात्री महावितरणवर धडक मोर्चा
वर्धा, 13 जुलै (हिं.स.) मंगरूळ गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या युवकांसह ग्रामस्थांनी शनिवारी मध्यरात्री महावितरणच्या वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुमारे १२ वाजतादरम्यान झालेल्या या आंदोलनान
युवकांचा मध्यरात्री महावितरणवर धडक मोर्चा


वर्धा, 13 जुलै (हिं.स.)

मंगरूळ गावातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या युवकांसह ग्रामस्थांनी शनिवारी मध्यरात्री महावितरणच्या वीज वितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुमारे १२ वाजतादरम्यान झालेल्या या आंदोलनानंतर अधिकाऱ्यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील वितरण रोहित्र (डीपी) वारंवार बिघडत असल्याने अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दोषग्रस्त डीपीची तातडीने दुरुस्ती करावी. आवश्यक असल्यास नवीन डीपी, वायर, इन्सुलेटर व इतर विद्युत साहित्य बदलून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच गावासाठी स्थानिक स्तरावर लाईनमन उपलब्ध ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली. सततच्या वीज खंडित हाेण्यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दिवसभर शेती व मजुरी करून घरी परतणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना रात्री विश्रांती मिळत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. लहान मुले, महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. मंगरूळ गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणे स्पष्ट करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.

तर बिछाने, चादरी घेऊन ठिय्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समस्या दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत कार्यवाही झाली नाही, तर दोन दिवसांत बिछाने व चादरी घेऊन महावितरण कार्यालयासमोर बेमुदत शांततापूर्ण ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

-----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande