
पुणे, 13 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्रात कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'अमृत' (AMRUT) आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'अमृत-सक्षम' हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम राज्यभर सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे युवक-युवती, महिला, स्वयंसेवी संस्था, उद्योजक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांना कचरा व्यवस्थापन क्षेत्रात शाश्वत उद्योग उभारण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
वाढते शहरीकरण आणि पर्यावरणीय नियमांमुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात व्यवसायाच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. कचरा ही केवळ समस्या नसून उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती व धूपनिर्मिती, प्लास्टिक, कागद आणि काच पुनर्वापर (रिसायकलिंग), तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) उभारणीसारख्या व्यवसायांद्वारे रोजगार आणि उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. 'अमृत-सक्षम' उपक्रमांतर्गत व्यवसायाची निवड, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना व अनुदानाचा लाभ, उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि उद्योग उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून संकल्पनेपासून प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंत सर्वंकष सहकार्य देणारा आहे. या उपक्रमासाठी कोणत्याही पूर्वानुभवाची आवश्यकता नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती, महिला बचत गट, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक, विविध संस्थांचे अधिकारी व कर्मचारी, स्वयंसेवी संस्था तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांना अमृतच्या विविध योजनांचा लाभ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वैयक्तिक व्याज परतावा योजना तसेच मोठ्या खरेदीदारांशी आणि इतर उद्योजकांशी नेटवर्किंगची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
इच्छुकांनी 'अमृत-सक्षम' किंवा महाराष्ट्र अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांशी संपर्क साधून जिल्हानिहाय कार्यशाळांची माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्राथमिक माहिती देण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता AMRUTच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर थेट ऑनलाइन सत्र आयोजित करण्यात आले असून, इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु