
पुणे, 13 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या वतीने जेजुरी येथे पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेचा विचार करून हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या वेळी संस्थानाचे सचिव दत्तूजी समरीतकर तसेच विश्वस्त व मुख्य पुजारी केशवरावजी फुलझेले उपस्थित होते. त्यांनी वारकऱ्यांना हायजिनिक किटचे वितरण करत त्यांच्या सुखकर आणि सुरक्षित वारीसाठी शुभेच्छा दिल्या.
वारकरी संप्रदायातील सेवाभावाची परंपरा जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून वारकऱ्यांच्या आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत संस्थानाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाचा हा उपक्रम विशेष ठरला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु