
आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण; १६ जुलैपर्यंत अर्जाची संधी
पुणे, 13 जुलै : अनुसूचित जातीतील तरुण-तरुणींना आधुनिक उद्योग क्षेत्रासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून राज्यभरात ५० मोफत प्रगत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक उमेदवारांना १६ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे आणि कौशल्य विकास विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्यव्यापी योजना राबविण्यात येत आहे.
बदलत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जनरेटिव्ह एआय, सायबर सुरक्षा, मशीन लर्निंग, ई-व्हेईकल प्रॉडक्ट डिझाइन, फिनटेक ऑपरेशन्स यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय आठवी आणि दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सीएनसी ऑपरेटर, इंडस्ट्रियल वेल्डिंग यांसारखे रोजगाराभिमुख कौशल्य अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे.
या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी टाटा स्ट्राइव्ह, टेक महिंद्रा फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी यांसारख्या नामांकित संस्थांची निवड करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १६ जुलैपूर्वी ऑनलाइन अर्ज करून या मोफत कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु