उत्तर सोलापूर -वडाळा अप्पर तहसील कार्यालयावरून भाजपमध्ये मतभेद
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.) : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या निर्णयावरून सोलापूर भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूर
Subhash deshamukha


सोलापूर, 13 जुलै (हिं.स.) : उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याच्या निर्णयावरून सोलापूर भाजपमधील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूरमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूरचे आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष (बापू) देशमुख यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी वडाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली. या निर्णयासाठी महसूल मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच मंजुरी मिळाल्याचा दावा आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाचे श्रेय आणि त्यामागील प्रक्रियेबाबत उत्तर सोलापूरमधील स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्थानिक नेत्यांच्या मते, उत्तर सोलापूर तालुक्याशी संबंधित प्रशासकीय निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे आवश्यक होते. तसेच दुसऱ्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या अंतर्गत प्रशासकीय विषयांमध्ये हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, पंचायत समितीच्या सभापती तेजस्विनी बोराडे, उपसभापती सुनील भोसले आणि पंचायत समिती सदस्या सुनीता बारसकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी वडाळा येथील अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी पालकमंत्र्यांकडे सादर केले.

दरम्यान, या वादामुळे सोलापूर भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या विषयावर आमदार सुभाष (बापू) देशमुख यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, शासनाकडूनही या मागणीबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande