न्यायालयीन कामकाजात साक्षीला अनन्यसाधारण महत्त्व - सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर
रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । संपूर्ण न्यायालयीन कामकाजात साक्षीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी केले. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात भारतीय साक्ष अधिनियमाव
कीर विधी महाविद्यालयात अॅड अनिरुद्ध फणसेकर यांचे व्याख्यान


रत्नागिरी, 13 जुलै (हिं.स.) । संपूर्ण न्यायालयीन कामकाजात साक्षीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे प्रतिपादन सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर यांनी केले.

येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात भारतीय साक्ष अधिनियमावर त्यांचे व्याख्यान झाले. श्रीविधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कायदेविषयक ज्ञानवृद्धीसाठी भारतीय साक्ष अधिनियम या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विधी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व रत्नागिरी जिल्हा सरकारी वकील ॲड. फणसेकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

ॲड. फणसेकर यांनी भारतीय साक्ष अधिनियमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, महत्त्वपूर्ण तरतुदी, बारकावे, न्यायालयीन प्रक्रियेतील उपयोगिता तसेच प्रत्यक्ष प्रकरणांतील उदाहरणांसह सविस्तर विवेचन केले. विषयाची विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी प्रभावी सांगड घालत त्यांनी न्यायालयीन कामकाजात साक्षीचे महत्त्व, पुराव्याचे मूल्य आणि न्यायनिर्णय प्रक्रियेत त्याची निर्णायक भूमिका स्पष्ट केली. विविध प्रत्यक्षिक उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांना कायद्याची व्यावहारिक अंमलबजावणी अधिक स्पष्टपणे समजली.

प्र. प्राचार्य डॉ. आशीष बर्वे यांनी स्वागत करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता कायद्याच्या व्यावहारिक अंगांचा अभ्यास करून स्वतःला सक्षम विधिज्ञ म्हणून घडविण्याची गरज आहे.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ज्ञान समृद्ध होण्याबरोबरच न्यायालयीन व्यवहार, कायदेशीर विश्लेषण क्षमता आणि वास्तव जीवनातील कायदेशीर आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक व्यावसायिक दृष्टी विकसित होण्यास मोलाची मदत झाली, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande