‘प्रशासनावर दबाव सहन केला जाणार नाही’; मोहिते पाटील प्रकरणावर जयकुमार गोरेंची भूमिका
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पंचायत समितीतील एका अधिकाऱ्यामधील कथित दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार
Jaykumar gore newss


सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पंचायत समितीतील एका अधिकाऱ्यामधील कथित दूरध्वनी संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. प्रशासनावर कोणत्याही प्रकारची दादागिरी किंवा दबाव सहन केला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

या प्रकरणात कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्याबाबत पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. दरम्यान, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद उपअभियंता मुलाणी यांच्याशी संबंधित जुन्या बातम्यांची कात्रणे आणि विविध कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहेत. त्यातून समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि ट्रोलिंगचे सत्र सुरू झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात विविध मुद्द्यांवर सातत्याने शाब्दिक चकमकी होत असून, एकमेकांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. या नव्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष चर्चेत आला आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणात पोलिस प्रशासन पुढे कोणती कायदेशीर कारवाई करते, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande