
पुणे, 13 जुलै (हिं.स.)। आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसल्याने झालेल्या भीषण अपघातानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले आहे. अपघातातील मृत वारकऱ्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे तातडीने पूर्ण करण्यात आले असून, शासनामार्फत त्यांचे पार्थिव मूळ गावी पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. जखमी वारकऱ्यांना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप साळवे तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. जखमी वारकऱ्यांवर महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अपघातात जखमी झालेल्या गीताबाई शेलार (वय ७०), शैलजा दिनकर जगताप (वय ६०), मंगल विलास पाटील (वय ७०) यांच्यासह अन्य जखमींवर ग्रामीण रुग्णालय, जेजुरी येथे उपचार सुरू आहेत. तसेच सात गंभीर जखमींना जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यापैकी एका अतिगंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून जखमी वारकऱ्यांवर आवश्यक वैद्यकीय उपचार आणि सर्वतोपरी मदत सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु