
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)मंगळवेढा आगारातील जुन्या व वारंवार नादुरुस्त होणाऱ्या एसटी बसेसमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने आगारासाठी तातडीने पाच नवीन एसटी बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांनी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवेढा आगाराच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्ण हे दैनंदिन प्रवासासाठी एसटी सेवेवर अवलंबून आहेत. मात्र, आगारातील सुमारे ६० बसेसपैकी बहुतांश बसेस जुन्या झाल्याने त्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. परिणामी बसफेऱ्या उशिरा होणे, काही फेऱ्या रद्द कराव्या लागणे आणि प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे अशा समस्या निर्माण होत आहेत. यामुळे नागरिकांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लांब पल्ल्याच्या मार्गांवर धावणाऱ्या बसेसमध्येही वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संत दामाजी पंतांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात धार्मिक, सामाजिक आणि व्यावसायिक कारणांसह पंढरपूर यात्रेसाठीही मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सतत ये-जा सुरू असते. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून आगारासाठी नवीन, सुरक्षित आणि दर्जेदार एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे अनिल सावंत यांनी निवेदनात नमूद केले आहे. मंगळवेढा आगाराला तातडीने पाच नवीन बसेस उपलब्ध करून देऊन प्रवाशांना सुरक्षित, नियमित आणि दर्जेदार सेवा द्यावी, अशी मागणीही त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड