
मुंबई, 13 जुलै (हिं.स.)। मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी एसी लोकल मुलुंड स्थानकात सुमारे १५ मिनिटे उभी राहिली. याच दरम्यान लोकलमधील एसी यंत्रणा अचानक बंद पडल्याने डब्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आणि अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही वेळातच तीन ते चार प्रवासी गुदमरल्यामुळे बेशुद्ध पडल्याने स्थानकावर एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३३ वाजता टिटवाळा येथून सुटलेली ही एसी लोकल साडेनऊच्या सुमारास मुलुंड स्थानकाच्या दुसऱ्या फलाटावर पोहोचली. त्या वेळी कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने डबा पूर्णपणे भरलेला होता. तांत्रिक बिघाडामुळे एसीची एक यंत्रणा काम करत नव्हती. एसी लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे डब्यातील उष्णता झपाट्याने वाढली. त्यामुळे अनेक प्रवाशांना घुसमट होऊ लागली आणि काही जणांची प्रकृती बिघडली.
प्रवासी बेशुद्ध पडताच इतर नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. बेशुद्ध झालेल्या प्रवाशांना लोकलमधून बाहेर काढून फलाटावरील बाकांवर बसवण्यात आले. त्यांना पाणी देण्यात आले तसेच वारा घालून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचे चित्रफिती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या असून, त्या पाहून अनेकांनी एसी लोकलच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेत बेशुद्ध पडलेल्या सुगंधा सिंग आणि राधिका गोटूवलेकर या महिला प्रवाशांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर फहीम अन्सारी यांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनाही घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने या बिघाडानंतर संबंधित एसी लोकलची सेवा तात्काळ रद्द केली. पुढील प्रवासासाठी कुर्ला स्थानकात सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले आणि लोकल सेवेतून बाजूला काढण्यात आली. ही लोकल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात येणार असून, तिच्या पुढील दोन फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्या ऐवजी साध्या नॉन-एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.
गर्दीच्या वेळी आरामदायी प्रवासासाठी प्रवासी अधिक भाडे देऊन एसी लोकलची निवड करतात. मात्र, अशा प्रकारचा बिघाड झाल्यास बंद दरवाजे आणि खिडक्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे एसी लोकलची नियमित देखभाल, तांत्रिक तपासणी आणि आपत्कालीन व्यवस्थेची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याची मागणी आता प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule