एआयच्या युगात तत्त्वनिष्ठ पत्रकारिता जपणे हीच मोठी कसोटी : श्रीकांत मोरे
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.) : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पत्रकारितेचा प्रभाव वाढत असताना निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारिता जपणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी कसोटी असल्याचे प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्य
grdf


सोलापूर, 13 जुलै (हिं.स.) : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पत्रकारितेचा प्रभाव वाढत असताना निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारिता जपणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी कसोटी असल्याचे प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केले.

कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येणाऱ्या ‘कै. अविनाश कुलकर्णी आदर्श पत्रकार पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पत्रकार रविंद्र देशमुख यांना श्रीकांत मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी राकेश टोळये, नीता कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे होते.

यावेळी बोलताना श्रीकांत मोरे म्हणाले की, पत्रकारितेचे मूलभूत ध्येय समाजात जनजागृती करणे आणि सत्तेला प्रश्न विचारणे हे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही पत्रकारांनी माहितीची पडताळणी, सखोल अभ्यास आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत लोकहिताला प्राधान्य द्यावे.

कै. अविनाश कुलकर्णी हे अभ्यासू, मितभाषी आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार होते. त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीतील पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर रविंद्र देशमुख यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, कै. अविनाश कुलकर्णी यांची निस्वार्थी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा सन्मान असून, त्यामुळे जबाबदारी अधिक वाढली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. अविनाश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले, तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, अभय दिवाणजी, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब भास्कर, अविनाश सिताराम कुलकर्णी, प्रशांत जोशी, भगवान परळीकर, दशरथ वडतिले, प्रशांत बडवे, पद्माकर कुलकर्णी, कुलकर्णी कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande