
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)। पर्यटन विकासाला चालना देण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उजनी धरण परिसरासाठी २८२ कोटी ७५ लाख रुपयांचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला यापूर्वीच राज्याच्या शिखर समितीची मंजुरी मिळाली असली, तरी अंमलबजावणीच्या जबाबदारीवरून प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून रखडला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून विकासकामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिल्याने प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे आहेत.
उजनी धरण हे अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असून, या परिसरात पर्यटन विकासासाठी मोठी क्षमता आहे. जलपर्यटन, बोटिंग, निसर्ग पर्यटन आणि इतर पर्यटन सुविधांमुळे हा परिसर राज्यातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकतो. प्रकल्पाला शिखर समितीची मंजुरी मिळाल्यानंतरही पर्यटन विकासाची कामे कोणत्या विभागामार्फत राबवायची, यावरून जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यात समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंजुरी असूनही विकासकामांना सुरुवात होऊ शकली नव्हती. बोटिंगसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, मात्र तीही पुढे प्रलंबित राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत जलसंपदा विभाग, जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे उजनी जलपर्यटन प्रकल्पाला नव्याने गती मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड