
सोलापूर, 13 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आलेले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या राजकीय भूमिकेची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) बैठकीला निमंत्रित सदस्य असूनही ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नाराजीबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी झालेल्या डीपीसी बैठकीत आ. देशमुख यांची उपस्थिती अपेक्षित होती. मात्र ते बैठकीस गैरहजर राहिल्याने त्यांचा पक्षावरील किंवा स्थानिक घडामोडींवरील नाराजीचा सूर अद्याप कायम आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, त्याच दिवशी शिवसेना (शिंदे) गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सोलापूर दौऱ्यात होटगी मठ येथे आ. विजयकुमार देशमुख उपस्थित होते. त्यांनी काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांचे दर्शन घेतले.
या उपस्थितीनंतर देशमुख यांनी शिवसेना (शिंदे) नेत्यांशी राजकीय जवळीक साधल्याच्या चर्चांनाही सोशल मीडियावर उधाण आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सत्ता असतानाही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर शहरात आ. देवेंद्र कोठे, तर ग्रामीण भागात आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या राजकीय सक्रियतेमुळे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आ. विजयकुमार देशमुख पक्षांतर्गत गटबाजीमुळे नाराज आहेत का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड