हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेत उपचार; आरोग्य पथकाच्या सतर्कतेने टळला अनर्थ
पुणे, 13 जुलै (हिं.स.)। आषाढी वारी दरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्पर आणि प्रशिक्षित पथकामुळे वारकऱ्याला वेळेत जीवनरक्षक उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचवण्यात यश आले.
Jsj


पुणे, 13 जुलै (हिं.स.)।

आषाढी वारी दरम्यान एका वारकऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. मात्र, आरोग्य विभागाच्या तत्पर आणि प्रशिक्षित पथकामुळे वारकऱ्याला वेळेत जीवनरक्षक उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचवण्यात यश आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्यवर्धिनी केंद्र दिवे येथील कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि त्यांच्या आरोग्य पथकाने प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर (CPR) देऊन प्राथमिक जीवनरक्षक उपचार केले. त्यानंतर रुग्णाला पुढील उपचारासाठी त्वरित वैद्यकीय संस्थेत दाखल करण्यात आले.

आरोग्य यंत्रणेची सज्जता, कौशल्य आणि सेवाभावामुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी उपचार मिळाल्याने वारकऱ्याचे प्राण वाचण्यास मदत झाली. या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी संबंधित आरोग्य पथकाचे कौतुक केल्याची माहिती डॉ. हंकारे यांनी दिली.

दरम्यान, आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सहा सदस्यीय विशेष वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार हे पथक पुणे ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर वारकऱ्यांसोबत राहून आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवणार आहे.

या पथकात वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज बागडे, फार्मासिस्ट युवराज नातू, रुग्णवाहिका चालक ओंकार बबडे, मुकादम प्रवीण शिंदे, आरोग्य निरीक्षक किशोर थोरात आणि शिपाई संतोष साठे यांचा समावेश आहे. पथकाकडे आवश्यक औषधसाठा उपलब्ध असून पालखी प्रवासादरम्यान वारकऱ्यांना तत्काळ उपचार देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच सेवाकालाचा सविस्तर अहवाल आरोग्य कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांनी दिले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande