
यवतमाळ , 14 जुलै (हिं.स.)अर्धवट घरकुल बांधकामाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आजघडीस जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार २५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. तर दुसरा हप्ता एक लाख नऊ हजार ९५७ लाभार्थ्यांना दिला. परंतु ५४ हजारांवर लाभार्थ्यांना चक्क दुसर्!या हप्त्याची प्रतीक्षा आहे. परिणामी, अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अर्धवट स्थितीत आहेत. आता पावसाळ्यात लाभार्थ्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात आजघडीस २६ टक्के घरकुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्या अनुषंगाने एक लाख ७९ हजार दहा लाभार्थ्यांचे उद्दीष्ट जिल्ह्याला होते. यातून एक लाख ७६ हजार ९२३ लाभार्थ्यांच्या घरकुलाला मंजुरी देण्यात आली होती. तर दोन हजार ८७ लाभार्थी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, एक लाख ६४ हजार २५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. मात्र, विविध कारणामुळे १२ हजार ६६९ लाभार्थ्यांना पहिला हप्तासुद्धा प्रशासनाने दिला नाही. पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरकुल बांधकामाला सुरवात केली. पावसाळ्यापूर्वी बांधकाम होईल, अशी आस लाभार्थ्यांना होती.
मात्र, शासनाने निधी वितरणास ब्रेक लावला. लाभार्थ्यांची ओरड लक्षात घेता शासनाने एक लाख नऊ हजार ९५७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता वितरित केला. पैस मिळताच लाभार्थ्यांनी गतीमान पद्धतीने बांधकाम करण्यास सुरवात केली. परंतु ५४ हजार २९७ लाभार्थ्यांना चक्क दुसरा, तर ४४ हजार ६८४ लाभार्थ्यांना चक्क तिसरा हप्तासुद्धा मिळाला नाही. या प्रकारामुळे लाभार्थ्यांची मोठी परवड सुरू झाली आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात चक्क उघड्यावर वास्तव्य करण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली आहे. हप्त्याच्या संदर्भात लाभार्थी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत. मात्र, शासनस्तरावरूनच निधी वितरित करण्यात आलाच नाही दिल्या जात आहे. आजघडीस जिल्ह्यात केवळ १८ हजार ५९८ (२६ टक्के) घरकुलाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. अपूर्ण घरकुल राहिलेले लाभार्थी त्रस्त झाले असून, त्वरित निधी द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा लाभार्थ्यांकडून दिल्या जात आहे.
१८ हजारांवर बांधकामे प्रगतीपथावर
लाभार्थ्यांनी मंजुरीनंतर घरकुल बांधकामाला सुरवात केली. जवळची संपूर्ण जमापुंजी बांधकामात खर्ची घातली आहे. आतापर्यंत २६ टक्के कामे पूर्णत्वास आली आहे. तर जवळपास १८ हजार ५९८ कामे प्रगतीपथावर आहे. आता निधी मिळाल्याशिवाय ही कामे पूर्णत्वास येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे निधीकरिता प्रशासनाला विशेष पावले उचलावे लागणार आहे.
आतापर्यंत पूर्ण झालेली कामे
आर्णी - २९५३ बाभूळगाव - १८५४ दारव्हा - ३१३३ दिग्रस - ३१८६ घाटंजी - २२७० कळंब - १९०८ केळापूर - १८८५ महागाव - ३९७४ मारेगाव - ८८१ नेर - १९१९ पुसद - ७४२३ राळेगाव - २०५९ उमरखेड - ७३९६ वणी - १९०५ यवतमाळ - २५२४ झरीजामणी - १४०५ एकूण - ४६६७५
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी