
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने एक वर्षाच्या नव्हे तर किमान पाच वर्षांच्या दीर्घकालीन विकास आराखड्याची अंमलबजावणी करावी, तसेच चिखलदऱ्यातील पाणीटंचाई तातडीने दूर करून पर्यटनाला चालना द्यावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदऱ्याची स्वतंत्र ओळख असून ते नैसर्गिक सौंदर्याने नटलेले पर्यटनस्थळ आहे. उंच डोंगररांगा, हिरवाईने नटलेले घाटमार्ग, खोल दऱ्या, धबधबे, निसर्गरम्य दऱ्याखोऱ्या आणि मेळघाट व्याघ्रप्रकल्पामुळे चिखलदऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून पाणीटंचाई ही गंभीर समस्या निर्माण झाल्याने पर्यटकांच्या संख्येवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्कालीन राज्यमंत्री वसुधाताई देशमुख यांनी चिखलदऱ्याच्या पायथ्याशी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता सापन धरणाची सुविधाही उपलब्ध आहे. धरणाशी संबंधित कोणत्याही प्रशासकीय किंवा महसुली अडचणी असल्यास आपण त्या महसूल मंत्री म्हणून तातडीने दूर करून चिखलदऱ्याला नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही वसुधा देशमुख यांनी केली आहे.
महाराष्ट्राला निसर्गाने लाभलेल्या प्रमुख हिल स्टेशनपैकी सातारा जिल्ह्यातील कास पठार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली आणि अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ही तीन पर्यटनस्थळे राज्याची नैसर्गिक संपदा असल्याचे त्यांनी नमूद केले. कास पठारावरील रंगीबेरंगी फुलांचा गालीचा, आंबोलीतील धबधबे व हिरवाई तसेच चिखलदऱ्यातील पर्वतरांगा, दऱ्या, धबधबे आणि वन्यजीव संपदा ही महाराष्ट्राच्या पर्यटनाची मोठी ताकद असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
यासंदर्भात वसुधा देशमुख म्हणाल्या की, चिखलदऱ्याचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास झाल्यास विदर्भातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि राज्याच्या पर्यटन नकाशावर चिखलदऱ्याचे स्थान अधिक भक्कम होईल असा विश्वासही
त्यांनी व्यक्त केला.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी