अचलपूर तालुक्यात ३११७४.४० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) अचलपूर तालुक्यात ३११७४.४० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही भागांत अजूनही पेरणी सुरू आहे. यंदाच्या हंगामात प्रामुख्याने कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या लागवडीला
अचलपूर तालुक्यात आंतरमशागतीच्या कामांना वेग


अमरावती, 14 जुलै (हिं.स.) अचलपूर तालुक्यात ३११७४.४० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या असून सध्या आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. काही भागांत अजूनही पेरणी सुरू आहे. यंदाच्या हंगामात प्रामुख्याने कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिकांच्या लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. २३ जूनला मॉन्सूनच्या पावसाने लावलेल्या दमदार हजेरीनंतर तालुक्यात पेरणीला वेग आला व सध्या जुलैमध्ये पिकांची उगवणही चांगली झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सध्या बऱ्याच भागांत आंतरमशागतीच्या कामांना वेग आला असून खूरपणी, निंदणी, खत देणे आदी कामे शेतात सुरू आहेत. मजुरांची उपलब्धता कमी असल्याने काही शेतकरी तणनाशक फवारणीचा पर्याय शोधत आहेत. ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव आढळत आहे तेथील शेतकरी तज्ञांचा सल्लाही घेऊन उपाययोजना करीत आहेत. काही भागांत पेरण्या अजूनही सुरू असल्याचे चित्र आहे. मजुरी, खते आदींच्या वाढलेल्या भावाने शेतीला येणारा खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अचलपूर तालुक्यात ज्वारी ४५, मका ७८९, तूर ७८७९, मूग १३, उडीद १०, इतर कडधान्य ९३ टक्के, सोयाबीन ६९७६, इतर २, कापूस १५३६७, ऊस ०.४० असे ३११७४.४० हेक्टरवर विविध पिकांची पेरणी झाली आहे.

वन्यप्राण्यांचा हैदोस

अचलपूर तालुक्यातील बऱ्याच भागात सकाळी रोही आणि हरणे, तर रात्रीला रानडुकरे पिकांची नासाडी करीत आहेत. तर कुठे तुरीचे पीक फस्त करीत असल्याने काही शेतकऱ्यांवर टोपण करण्याची वेळ आली असून नुकसान सोसावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande