
:रायगड, १४ जुलै (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी दारूच्या नशेत समुद्रात उतरलेल्या पुण्यातील एका पर्यटकाचा स्थानिक जीवरक्षकांनी धाडस आणि तत्परता दाखवत जीव वाचवला. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्था आणि जीवरक्षकांच्या सतर्कतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पुण्यातील केलवली फाटा परिसरातील रहिवासी शाहरुख शेख (वय अंदाजे ३०) हा अलिबाग समुद्रकिनारी पर्यटनासाठी आला होता. समुद्रात पोहण्यासाठी उतरल्यावर तो खोल पाण्यात गेला आणि लाटांच्या तीव्र प्रवाहात अडकून बुडू लागला.
किनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी ही घटना लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले. जीवरक्षक कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांनी समुद्रात उडी घेत सुमारे १०० ते १५० मीटर अंतरावर जाऊन शाहरुख शेख याला गाठले. अथक प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले. त्यानंतर तातडीने प्रथमोपचार करण्यात आल्याने त्याची प्रकृती स्थिर असून मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, अलिबाग समुद्रकिनारी मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने दारूच्या नशेत किंवा भरतीच्या वेळी समुद्रात उतरणे अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा जीवरक्षकांनी पुन्हा एकदा दिला आहे. समुद्रातील तीव्र प्रवाह आणि उंच लाटांचा अंदाज न आल्याने जीवितहानीच्या घटना घडू शकतात, त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच जीवरक्षकांच्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील सात पर्यटकांचे समुद्रात बुडण्यापासून प्राण वाचवले होते. सलग दुसऱ्यांदा दाखवलेल्या धाडसी कामगिरीमुळे कुणाल सारंग, प्रथमेश सारंग, निलेश कामतेकर आणि महेश पाटील यांच्या शौर्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)