मनसेकडून चनोडा–मारेगाव मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा
यवतमाळ, १४ जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चनोडा ते मारेगाव मार्गावर मोफत बस सेवा सुरू
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मनसेचा पुढाकार


यवतमाळ, १४ जुलै (हिं.स.) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चनोडा ते मारेगाव मार्गावर मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘अमित ठाकरे दत्तक योजने’ अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना वाहतुकीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मानव विकास मिशनअंतर्गत उपलब्ध बससेवेत काही ठिकाणी अपेक्षित सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास गैरसोयीचा ठरत होता. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत मनसेने ही मोफत बस सेवा सुरू केली आहे.

या उपक्रमामुळे चनोडा–मारेगाव मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अधिक सुलभ होणार असून, पालकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

मोफत बस सेवेच्या उद्घाटनप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मारेगाव तालुका अध्यक्ष रुपेश ढोके, शहराध्यक्ष चांद बहादे, तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, रोशन शिंदे, निखिल मेहता, आकाश खामणकर, अॅड. योगेंद्र तुराणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘एक हात विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून स्वागत होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande