
मुंबई, 14 जुलै (हिं.स.)।- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज १९ वा लोकशाही दिन घेण्यात आला. 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा. प्र. से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित १९ व्या लोकशाही दिनात दोन अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या लोकशाही दिनात श्री. दीपक सोनावळे यांनी अर्ज केला होता. श्री. सोनावळे वास्तव्यास असलेल्या मुंबईतील फितवाला रोड, एल्फिस्टन रोड येथील इमारत क्रमांक १८ या उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी संबंधित विकासकाला मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे सन २००६ व सन २००९ मध्ये ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. सदर पुनर्विकसित इमारतीमध्ये संबंधित विकासकाकडून श्री. सोनावळे यांना आजपर्यंत पुनर्वसन सदनिका मिळालेली नाही, विकासकाने दरमाह भाडे दिलेले नाही तसेच कायमस्वरूपी पर्यायी निवास करार (PAAA) करारही केलेला नाही. याबाबत श्री. सोनावळे यांनी आजच्या लोकशाही दिनात अर्ज केला.
या अर्जावर सुनावणी करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल यांनी संबंधित विकासकाला सुनावणीसाठी बोलावण्याचे संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले. सदर सुनावणीमध्ये संबंधित विकासकाला श्री. सोनावळे यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याबाबत निर्देशित करणार असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर