
अमरावती, 14 जुलै (हिं.स.) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे आणि निकृष्ट अथवा बोगस बियाण्यांमुळे होणारे नुकसान टळावे, यासाठी कृषी विभागाकडून बियाण्यांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. मात्र यंदा चांदूरबाजार तालुक्यात सोयाबीनच्या बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्वी पाठविण्यात आले असतानाही बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्यानंतरही तपासणी अहवाल प्राप्त न झाल्याने संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तालुक्यातील विविध कृषी केंद्रांतून ३० मे ते २४ जूनदरम्यान सोयाबीन बियाण्यांचे ३४ नमुने घेऊन नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. मात्र आतापर्यंत केवळ चार नमुन्यांचेच अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाले असून, उर्वरित ३० नमुन्यांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाण्यांच्या गुणवत्तेची खात्री करण्यामागील उद्देशच फोल ठरत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, तालुक्यात एका कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या आहेत. आतापर्यंत ६२ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे लेखी तक्रारी दाखल केल्या असून, सुमारे ६५ एकरांवरील पिकांना त्याचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तपासणी अहवाल वेळेत प्राप्त झाला असता तर संबंधित बियाण्यांची विक्री थांबवून आर्थिक नुकसान टाळता आले असते. तपासणी अहवालातील विलंबामुळे प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीबरोबरच कृषी विभागाच्या समन्वयावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा, संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई व्हावी आणि भविष्यात पेरणीपूर्वीच तपासणी अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा अधिक गतिमान करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
याबाबत कृषी अधिकारी प्रवीण पवार म्हणाले की, ३० मे ते २४ जून या कालावधीत सोयाबीन बियाण्यांचे ३४ नमुने घेऊन नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १० जुलैपर्यंत केवळ चार नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित ३० अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
--------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी