
अमरावती, 14 जुलै (हिं.स.)। महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या समोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे आतापर्यंत ९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तालुक्यात पावसाची अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशागत करून वेळेत पेरणी केली. मात्र, अनेक शेतांमध्ये सोयाबीनची उगवण अत्यल्प किंवा नगण्य झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. महागडे बियाणे, मशागत, मजुरी व पेरणीचा खर्च वाया गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. काही शेतकऱ्यांना गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. उगवणशक्ती कमी असलेले किंवा निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्रीस आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाने तक्रारींची दखल घेऊन बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवरही शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कृषी सहायकांनी नियमितपणे शेतावर जाऊन मार्गदर्शन केले असते तर अनेक समस्या टाळता आल्या असत्या, असा आरोप शेतकरी करीत आहेत. वेळेत कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
प्रयोगशाळा अहवालानंतर कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपासणी पथक कार्यरत असून, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, महाबीजचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे अधिकारी या पथकात सहभागी आहेत. तक्रारीनुसार संबंधित बियाण्यांच्या लॉट क्रमांकाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. अहवालात दोष सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळवून दिला जाईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली.
३० टक्केच उगवण झाली सालोड येथील शेतकरी सचिन मधुकरराव इंझळकर यांनी २७ जून रोजी शिफारशीनुसार सोयाबीनची पेरणी केली. मात्र, ७ ते ८ दिवसांनंतर शेताची पाहणी केली असता बियाण्याची उगवण केवळ ३० टक्क्यांच्या आसपास झाल्याचे निदर्शनास आले. निकृष्ट बियाण्यामुळे मशागत, पेरणी, मजुरी व बियाण्याचा सर्व खर्च वाया गेला असून आता दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी