
अमरावती, 14 जुलै (हिं.स.)। तीन तालुक्यांतील शेकडो गावांना पाणीपुरवठा करणारा जीवन संजीवनी म्हणून शहानूर धरणाचा उल्लेख होतो. मात्र, धरणाच्या आतमध्ये लावण्यात आलेल्या आकडेवारीच्या पट्टीच्या खाली पाणीसाठा गेल्यामुळे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यामुळे पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असला तरी यादरम्यान धरणाला पाणीपुरवठा होणाऱ्या नदीतून एक थेंबसुद्धा पाणी धरणात शिरलेले नाही. पथ्रोट जिल्हा परिषद सर्कलमधील वाघडोह याठिकाणी शहानूर प्रकल्प धरण निर्मित आहे. या धरणांतर्गत दर्यापूर, अंजनगाव तालुक्यातील शेकडो गावांसह अचलपूर तालुक्यातील पथ्रोटसारख्या मोठ्या गावाला सुद्धा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. एवढेच नव्हे तर याच धरणाच्या पाण्यावर हजारो हेक्टर वरील पिकांचे सिंचनसुद्धा अवलंबून आहे. मागील वर्षी पाऊस विलंबाने सुरू झाला होता. त्यावेळी जुलै महिन्याच्या सुरवातीला शहानूर धरणात ३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. परंतु पुढे महिन्याच्या शेवटपर्यंत समाधानकारक पाऊस होऊन सदरचे धरणे शंभर टक्के भरले होते. परंतु यावर्षी तुलनेने ५ टक्के कमी पाणीसाठा म्हणजेच जवळपास ३४ टक्के पाणीसाठा सध्या स्थितीमध्ये धरणात उपलब्ध असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. दरम्यान येथील पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता मनोज पावरा यांनी धरण परिसराची पाहणी करून पाण्याच्या आवक संदर्भात आवश्यक अशी तयारी पूर्ण केली असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी