निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचे १७ नमुने नापास देवळी पोलिसात गुन्हा दाखल
वर्धा, 15 जुलै (हिं.स.)। शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांची पेरणी करण्यात आली. यातून उत्पन्न घेण्याच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बोगस बियाण्यांच्या संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान बूस्टर या कंपनीच्या सोयाबीन बिय
निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचे १७ नमुने नापास


वर्धा, 15 जुलै (हिं.स.)।

शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्यांची पेरणी करण्यात आली. यातून उत्पन्न घेण्याच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बोगस बियाण्यांच्या संकटाचा सामना करावा लागला. दरम्यान बूस्टर या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या. या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांचे १७ नमुने तपासणीत नापास झाले. याची दखल घेत देवळी पोलिस ठाण्यात संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कृषी विभागाच्या चौकशी दरम्यान जिल्हाभरातील बूस्टर कंपनीच्या १७ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळा चाचणीत फेल ठरल्याचे समोर आले आहे. कमी उगवण क्षमता आणि निकृष्ट गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. महागड्या दराने ब्रँडेड बियाणे खरेदी करूनही पीक उगवले नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. शिवाय त्यांचयावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. आधीच अनियमित पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना निकृष्ट बियाण्यांमुळे त्यांच्या संकटात अधिकची भर पडली आहे. दरम्यान, संबंधित कंपनीने जिल्हा कृषी अधीक्षकांना पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांच्या पिशव्यांची योग्य किंमत डीलरमार्फत परत करण्यात येईल तसेच १० जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणी देवळी पं. स. चे बीज निरीक्षक तथा कृषी अधिकारी युवराज जंगले यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली.

३०० हून अधिक तक्रारी

देवळीत सर्वाधिक कृषी विभागाकडे आतापर्यंत जिल्हाभरातून ३०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. त्यापैकी १८१ तक्रारी एकट्या देवळी तालुक्यातील आहेत. इतर तालुक्यांतूनही सातत्याने तक्रारी येत आहेत. विभागीय अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतांची पाहणी करून पिकांची स्थिती तपासत असून संबंधित कंपन्यांकडून स्पष्टीकरणही मागविण्यात आले आहे. कृषी विभागाने यापैकी १५६ तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण करून संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावत कारवाई सुरू केली आहे.

'बूस्टर' कंपनीच्या बियाण्यांबाबत सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहे. विशेषतः देवळी तालुक्यात तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याने कंपनीविरुद्ध देवळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. तर संबंधित कंपनीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. - शिवा जाधव, कृषी विकास अधिकारी, जि. प. वर्धा.

-----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande