बीज भांडवल योजनेचा तृतीयपंथीयांनी लाभ घ्यावा- डॉ. भारत बास्टेवाड
लातूर, 15 जुलै (हिं.स.)। तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बीज भांडवल योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना स्
बीज भांडवल योजना


लातूर, 15 जुलै (हिं.स.)। तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत बीज भांडवल योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगारासाठी तृतीयपंथीयांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे, कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षणाद्वारे शाश्वत रोजगार निर्माण करणे तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास साधणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून, लघुउद्योग व सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्यासाठी हे बीज भांडवल दिले जाणार आहे. लातूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले.

तृतीयपंथीयांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. उज्ज्वला पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल आठवले यांच्यासह तृतीयपंथीयांच्या संघटनांचे प्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बीज भांडवल योजनेअंतर्गत भाजी स्टॉल, वडा-पाव किंवा ज्यूस सेंटर, चहा व स्नॅक्स सेंटर, बेकरी, झेरॉक्स व लॅमिनेशन सेंटर, बांगडी दुकान, पिठाची गिरणी, ब्युटी पार्लर, सलून, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, मोबाईल शॉपी, मिनी मालवाहतूक टेम्पो, मसाला निर्मिती, लॉन्ड्री तसेच प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दुरुस्ती व्यवसायांसह अनेक स्वयंरोजगार उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामध्ये २५ हजार रुपये लघु कर्ज, ५० हजार रुपये मध्यम कर्ज आणि २ लाख रुपये दीर्घ कर्ज अशा तीन प्रकारांत कर्ज दिले जाते. या कर्ज रक्कमेमध्ये लाभार्थ्याचा ५ टक्के, शासनाचा ४५ टक्के आणि राष्ट्रीयकृत बँकेचा ५० टक्के आर्थिक सहभाग आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर ३ टक्के सवलतही दिली जाणार आहे. तसेच, या योजनेसाठी कोणत्याही जामीनदार किंवा तारणाची आवश्यकता भासणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

इच्छुक अर्जदारांनी अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, तृतीयपंथीय ओळखपत्र, आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, व्यवसायाच्या जागेचा पुरावा, यंत्रसामग्रीचे कोटेशन, आवश्यकतेनुसार भाडेकरार, ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडणे आवश्यक आहे. तृतीयपंथीयांनी स्वावलंबी होण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले.तृतीयपंथीयांसाठी आधार नोंदणी, विविध दाखले वाटप आदी बाबींचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande