
- 1 ऑगस्टपासून वेतनवाढीचा निर्णय
परभणी, 15 जुलै (हिं.स.)।
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रोजंदारीवर कार्यरत असलेल्या कुशल व अकुशल कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विद्यापीठ प्रशासनाकडून होत असलेले आर्थिक शोषण थांबवून शासनाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
सध्या विद्यापीठ प्रशासनाकडून कुशल कामगारांना प्रतिदिन 458 रुपये तर अकुशल कामगारांना 390 रुपये वेतन दिले जात आहे. मात्र शासनाच्या किमान वेतन नियमांनुसार मोटार वाहन चालकांना 725 रुपये, कुशल कामगारांना 574 रुपये, सफाई कामगारांना 652 रुपये तसेच शेती कामगारांना 390 रुपये प्रतिदिन वेतन देणे आवश्यक असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. शासनाने निश्चित केलेल्या वेतनदरांपेक्षा कमी वेतन दिल्यामुळे कामगारांवर आर्थिक संकट ओढवले असून त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
या पार्श्वभूमीवर संतप्त कामगारांनी काम बंद आंदोलन करत कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या मांडला. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन कामगार आयुक्त कराड यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट देत कामगार प्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात मध्यस्थी केली. यावेळी प्रचलित कामगार कायद्यानुसार कुशल व अकुशल कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत कामगार आयुक्तांनी विद्यापीठ प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले. कामगार आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर विद्यापीठ प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. त्यानुसार येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून वेतनवाढ लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याने आंदोलनाची सांगता करण्यात आली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे, राम गोळेगावकर, कामगार संघटनेचे एस. टी. गायकवाड, प्रसाद देवके, बालाजी रनेर, शरद रनेर, प्रताप चव्हाण, दसराव रनेर यांच्यासह विद्यापीठातील मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार व मजूर सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis