चंद्रपूर : बचाव कार्यादरम्यान वाघाचा मृत्यू ... पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष
चंद्रपूर, 15 जुलै (हिं.स.)। पळसगाव वनपरिक्षेत्रात काल दिनांक 14 जुलै 2026 रोजी मृत झालेल्या T202F S1 या वाघाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. त्यानुसार सदर उप-प्रौढ (Sub-adult) नर वाघाचा मृत्यू तीव्र श्वसनरोध (acute asphyxiation) आणि पाण
चंद्रपूर : बचाव कार्यादरम्यान वाघाचा मृत्यू ... पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष


चंद्रपूर, 15 जुलै (हिं.स.)।

पळसगाव वनपरिक्षेत्रात काल दिनांक 14 जुलै 2026 रोजी मृत झालेल्या T202F S1 या वाघाचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल हाती आला आहे. त्यानुसार सदर उप-प्रौढ (Sub-adult) नर वाघाचा मृत्यू तीव्र श्वसनरोध (acute asphyxiation) आणि पाण्यात बुडाल्यामुळे फुफ्फुसात द्रव भरल्यामुळे (fluid aspiration) झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली गेली आहे. काल बचाव कार्यादरम्यान (Rescue Operation) या वाघाला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.

तथापि, मृत्यूची नेमकी कारणे निश्चित करण्यासाठी आणि जाणीवपूर्वक विषप्रयोग झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारण्यासाठी शवविच्छेदनादरम्यान सूक्ष्मजीवशास्त्रीय (microbiological) व हिस्टोपॅथॉलॉजिकल (histopathological) तपासण्यांसाठी नमुने गोळा करण्यात आले असून, सर्व तपासण्यांचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर अंतिम अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला जाईल व त्यांनंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

दिनांक २८जून २०२६ रोजी चोरगाव परिसरात शिडामे यांच्या मृत्यूस T 202F S2 हा उपप्रौढ वाघ कारणीभूत ठरला होता. प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद प्रतिसाद दलाने (RRT) दिनांक ४ जुलै रोजी त्याला बेशुद्ध करून यशस्वीरित्या पकडले होते. त्यानंतर सदर वाघास जगण्याची दुसरी संधी देण्यासाठी त्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या वाघाने कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार न करता पुन्हा पळसगाव वनक्षेत्रातील लोकवस्तीच्या परिसरात वावर सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तीन दिवस संबंधित वाघाच्या हालचालींवर वन विभागामार्फत सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते.

काल संबंधित वाघास आमिष बांधून पकडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो डार्ट मारलेल्या ठिकाणापासून अंदाजे २०० मीटर अंतरावरील पाण्याच्या डबक्यात डोके पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळला. वैद्यकीय पथकाने त्याला त्वरीत पाण्याच्या बाहेर काढले. त्याला इंजेक्शन देऊन शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. मात्र वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांना यश आले नाही.

शवविच्छेदनाचे चलचित्रीकरण करण्यात आले असून शवविच्छेदनाच्या वेळी NTCA चे प्रतिनिधी बंडू धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक व प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक यांचे प्रतिनिधी मुकेश भांडक्कर, ताडोबा अंधारी बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. दुबे , पळसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बारसगडे, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व TTC चंद्रपूर पशुधन अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande