
लातूर, 15 जुलै (हिं.स.) लातूर शहरातील एम.जे. हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांच्या निधनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अंबेजोगाई रोडवरील एमआयटी कॉलेजसमोर उभ्या असलेल्या एका कारमध्ये डॉ. राठोड संशयास्पद परिस्थितीत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी फुलाबाई बनसोडे रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल :
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. डॉ. राठोड यांनी कारमध्येच स्वतःला भुलीचे इंजेक्शन टोचून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, घटनास्थळावरून काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. मात्र, ही आत्महत्या आहे की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.डॉ. राठोड यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या घटनेची माहिती शहरात पसरताच वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, रुग्ण आणि नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis