छ. संभाजीनगर - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित
छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै, (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून,या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांना निवडणूकविषयक सेवा अधिक सुलभ व प्रभ
छ. संभाजीनगर - मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणासाठी '१९५०' टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित


छत्रपती संभाजीनगर, 15 जुलै, (हिं.स.)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू असून,या मोहिमेदरम्यान पात्र मतदारांना निवडणूकविषयक सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हास्तरावर विशेष मदत कक्ष (Help Desk) स्थापन केला आहे.तसेच मतदारांच्या अडचणी,शंका आणि तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी '१९५०' हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून,जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या मदत कक्षामार्फत मतदारांना विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक,मतदार म्हणून पात्रता,नाव नोंदणी अथवा दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.तसेच मागील विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतील (२००२, २००४ व २००५) मतदार नोंदी शोधून देण्यासाठीही सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

याशिवाय,मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने भरताना आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली जाणार आहे.स्थलांतरित मतदारांना त्यांचा सध्याचा आणि पूर्वीचा विधानसभा मतदारसंघ ओळखून योग्य ठिकाणी नावनोंदणी करण्यासाठीही मदत करण्यात येणार आहे.

मतदारांना निवडणूक आयोगाच्या 'ECInet' या मोबाईल ॲपची माहिती देण्याबरोबरच त्यामधील 'Book a Call with BLO' या विशेष सुविधेबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.या सुविधेद्वारे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी थेट संपर्क साधून आवश्यक माहिती व सहाय्य मिळविता येणार आहे.

'१९५०' या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना विनामूल्य संपर्क साधून आपल्या शंका व अडचणींचे निरसन करता येणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही अडचणीसाठी नागरिकांनी '१९५०' हेल्पलाईन तसेच जिल्हास्तरीय मदत कक्षाचा उपयोग करावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande