
रायगड, 15 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित ‘उत्सव रानभाज्यांचा – जागर वसुंधरेचा’ या उपक्रमांतर्गत दिवेआगर येथे पारंपरिक रानभाजी पदार्थ स्पर्धा उत्साहात पार पडली. पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासह महिलांच्या पाककौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत परिसरातील १६ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
श्री. सुहास बापट यांच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात परीक्षकांचे पारंपरिक पद्धतीने हळद-कुंकू, पुष्पगुच्छ, बॅच आणि गजरा देऊन स्वागत करण्यात आली. त्यानंतर भारतमाता पूजन व अन्नपूर्णा पूजन करण्यात आले. श्रीमती जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित महिलांनी अन्नपूर्णा स्तोत्राचे सामूहिक पठण करून कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण निर्माण केले.
यावेळी परीक्षक सौ. वृंदा विनायक मराठे व सौ. उर्मिला श्रीनिवास केळकर यांचा परिचय करून देण्यात आला. यानंतर अमृत संस्थेच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे व उपव्यवस्थापक मंगेश भागुराम ढेबे यांनी उपस्थित महिलांना दिली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अमृत संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी महिलांनी पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांपासून पौष्टिक, स्वादिष्ट आणि आकर्षक पदार्थ तयार करून सादर केले. परीक्षकांनी पदार्थांची चव, पौष्टिकता, पारंपरिकता, सजावट, मांडणी व सादरीकरण या निकषांवर परीक्षण केले. कांदा-लसूण न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रानभाजी पदार्थाला प्रथम क्रमांक मिळाला.
स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना सहभाग प्रमाणपत्रे व आकर्षक भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. उपस्थित महिलांनी अशा प्रकारचे पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करणारे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणारे उपक्रम सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी बोलताना जिल्हा व्यवस्थापक शैलेश विनायक मराठे यांनी सांगितले की, या स्पर्धेचा उद्देश केवळ महिलांच्या पाककौशल्याला प्रोत्साहन देणे नसून शासनाच्या विविध योजनांची माहिती महिलांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविणे हाही आहे. तसेच रानभाज्यांमधील नैसर्गिक औषधी गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करून हे ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)