लातूर : मधुमेहग्रस्त मुलांसाठी आशेचा किरण; ६० जणांना मोफत सीजीएमएस मशीन
लातूर, 15 जुलै (हिं.स.)।टाईप-1 मधुमेहग्रस्त मुलांसाठी दिलासादायक ठरणारा विशेष उपक्रम लातूरमध्ये राबविण्यात आला. आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे टाईप-1 मधुमेहग्रस्तांसाठी विशेष का
विशेष कार्यशाळा


लातूर, 15 जुलै (हिं.स.)।टाईप-1 मधुमेहग्रस्त मुलांसाठी दिलासादायक ठरणारा विशेष उपक्रम लातूरमध्ये राबविण्यात आला. आरएसएसडीआय महाराष्ट्र चॅप्टर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे टाईप-1 मधुमेहग्रस्तांसाठी विशेष कार्यशाळा तसेच मधुमेह आणि लठ्ठपणा या विषयावरील एकदिवसीय वैद्यकीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या विशेष कार्यशाळेत ग्रामीण भागातील ६० गरजू टाईप-1 मधुमेहग्रस्त मुला-मुलींना अत्याधुनिक सीजीएमएस (Continuous Glucose Monitoring System – सतत ग्लुकोज निरीक्षण प्रणाली) मशीन मोफत बसविण्यात आली. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी २४ तास सातत्याने मोजणे शक्य होते. विशेष म्हणजे, वारंवार बोटाला टोचणी न लावता साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवता येत असल्याने रुग्णांना आहार आणि इन्सुलिनच्या डोसचे योग्य नियोजन करण्यास मोठी मदत होते.

कार्यशाळेदरम्यान उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी टाईप-1 मधुमेहग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या विविध शंकांचे निरसन केले. मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन, आधुनिक उपचारपद्धती, इन्सुलिनचा वापर, आहाराचे नियोजन आणि निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

५०० डॉक्टरांचा वैद्यकीय परिषदेत सहभाग

विशेष कार्यशाळेनंतर मधुमेह आणि लठ्ठपणा या विषयावर एकदिवसीय वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेला लातूर आणि परिसरातील सुमारे ५०० डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला..

या परिषदेत मुंबईचे सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पनीकर, डॉ. विजय नेगलूर, डॉ. संहिता वालावळकर, डॉ. मनोज चावला, डॉ. राजीव कोविल, डॉ. पूर्वी चावला, डॉ. निखिल नाशिककर, डॉ. व्यंकटेश शिवणे आदींनी मधुमेह व्यवस्थापन, लठ्ठपणा नियंत्रण आणि आधुनिक उपचारपद्धतींवर सखोल मार्गदर्शन केले.

मान्यवरांच्या उपस्थितीत आधुनिक उपचारपद्धतींवर मंथन

परिषदेत मधुमेह आणि लठ्ठपणाच्या वाढत्या समस्येवर तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, मधुमेह नियंत्रणासाठी उपलब्ध नव्या उपचारपद्धती, लठ्ठपणा नियंत्रण आणि रुग्णांच्या जीवनशैलीतील आवश्यक बदल यावर सखोल चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील टाईप-1 मधुमेहग्रस्तांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande