श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वैद्यनाथ नगरीत रिंगण सोहळा
बीड, 15 जुलै (हिं.स.)श्री संत नामदेव महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त वैद्यनाथ नगरीत पार पडलेला अश्व रिंगण सोहळा भक्तिरसाने ओथंबून गेला. अखिल भारतीय वारकरी संस्था आणि नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या सो
श्री संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वैद्यनाथ नगरीत रिंगण सोहळा


बीड, 15 जुलै (हिं.स.)श्री संत नामदेव महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यानिमित्त वैद्यनाथ नगरीत पार पडलेला अश्व रिंगण सोहळा भक्तिरसाने ओथंबून गेला. अखिल भारतीय वारकरी संस्था आणि नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या सोहळ्यात हजारो वारकरी, भाविक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.टाळ-मृदंगाचा निनाद, ज्ञानोबा-तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल चा अखंड जयघोष, भगव्या पताकांची उंच भरारी आणि भक्तीच्या महासागरात न्हालेली वैद्यनाथ नगरी... हे दृश्य प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.

या सोहळ्यातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे आपले कर्तव्यदक्ष पोलिस बांधवही काही क्षणांसाठी हरीनामात तल्लीन झाले. दिवसरात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या या रक्षकांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळत, हरीनामाचा आनंद लुटत भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले. तो क्षण केवळ आनंदाचा नव्हता, तर माणुसकी, समता आणि भक्तीचा सुंदर संगम होता.

सद् रक्षणाय, खल निग्रहणाय हे ब्रीद अंगीकारून समाजाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक क्षणी सज्ज असणारे आपले पोलिस बांधव हे खऱ्या अर्थाने समाजाचे आधारस्तंभ आहेत. कठोर शिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव जपत असतानाही त्यांच्या अंतःकरणात भक्तीची ओल, संस्कृतीची जपणूक आणि माणुसकीचे सौंदर्य जिवंत आहे, याचे हे प्रेरणादायी दर्शन होते.

वारकरी संप्रदाय आपल्याला समतेचा, प्रेमाचा, सेवाभावाचा आणि मानवतेचा संदेश देतो. आज पोलिस बांधव आणि वारकरी एकाच भक्तिरंगात रंगून गेलेले दृश्य पाहताना, समाजातील प्रत्येक घटक एकमेकांशी किती घट्ट जोडलेला आहे, याची प्रचिती आली.

या दिव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय वारकरी संस्था, नगर परिषद परळी वैजनाथ, सर्व वारकरी, स्वयंसेवक, प्रशासन आणि विशेषतः आपल्या पोलिस बांधवांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक आभार.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande