
धाराशिव, 15 जुलै (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), जिल्हा कार्यालय,धाराशिव यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.इच्छुक विद्यार्थ्यांनी २४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत इयत्ता दहावी, बारावी,पदवी,पदव्युत्तर,वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातींतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे.संबंधित विद्यार्थ्यांनी सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले असावेत.उपलब्ध निधीच्या अधीन राहून तसेच ज्येष्ठता व गुणक्रमानुसार पात्र विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. अर्जासोबत स्वहस्ताक्षरातील अर्ज, मोबाईल क्रमांक,शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका,पुढील वर्षात प्रवेश घेतल्याचा पुरावा अथवा प्रवेश शुल्काची पावती,आधार कार्ड, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे.
पूर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,तळमजला,धाराशिव येथील कार्यालयात २४ जुलैपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष जमा करावीत किंवा टपालाद्वारे पाठवावीत.निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मांग,मातंग समाज तसेच तत्सम १२ पोटजातींतील पात्र युवा व युवतींनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis