बीड : एसआयआर मतदार नोंदणीतील ऑनलाइन त्रुटींमुळे नागरिक त्रस्त; माजी उपनगराध्यक्षांचे तहसीलदारांना निवेदन
बीड, 15 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई शहरात सध्या सुरू असलेल्या एसआयआर २०२६ मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाईन प्रणालीतील ''ॲनॉमली'' (त्रुटी) मुळे मोठा गोंधळ उडाला असून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या प्रशासकीय ढिसाळपणामुळे मतदारांमध्ये असुरक्षिततेची आ
माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम यांची तहसीलदारांकडे मागणी


बीड, 15 जुलै (हिं.स.)।अंबाजोगाई शहरात सध्या सुरू असलेल्या एसआयआर २०२६ मतदार नोंदणी प्रक्रियेत ऑनलाईन प्रणालीतील 'ॲनॉमली' (त्रुटी) मुळे मोठा गोंधळ उडाला असून नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या प्रशासकीय ढिसाळपणामुळे मतदारांमध्ये असुरक्षिततेची आणि संभ्रमाची भावना निर्माण झाली असून, नागरिकांचा हा त्रास दूर करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज तहसीलदार विलास तरंगे यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने सविस्तर निवेदन सादर केले.

सध्या ऑनलाईन फॉर्म भरताना सिस्टीममध्ये अचानक 'ॲनॉमली' अशी तांत्रिक त्रुटी दर्शवली जात असल्याने अनेक पात्र नागरिकांची नावे वगळली जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या चुकीमुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पूर्वीच्या यादीत अचूक असलेली नावे अचानक वगळली गेल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. या पार्श्वभूमीवर, शिष्टमंडळाने या समस्येचे वरिष्ठ पातळीवरून त्वरित निवारण करण्याची अत्यंत आग्रही मागणी प्रशासनासमोर लावून धरली. तसेच, तांत्रिक पडताळणी करून वगळलेली नावे पुन्हा अद्ययावत करावीत आणि ज्या प्रभागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे काम अपूर्ण आहे, तेथे बीएलओ यांना योग्य मार्गदर्शन करून काम तातडीने पूर्ण करून घेण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

नागरिकांच्या या तीव्र भावना आणि समस्यांची दखल घेत तहसीलदार विलास तरंगे यांनी शिष्टमंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ 'ॲनॉमली'मध्ये नाव आले म्हणून कोणाचेही नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असा मोठा दिलासा त्यांनी प्रशासनाच्या वतीने दिला आहे. कोणतेही नाव कमी करण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तीन वेळा घरी भेट देऊन शहानिशा केली जाईल, जेणेकरून एकाही पात्र मतदारावर अन्याय होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन तहसीलदारांनी दिले. या महत्त्वपूर्ण चर्चेवेळी शिष्टमंडळात प्रदीप दहिवाळ, सय्यद दानिश, शेख हारून, शेख मोहसीन इझहार यांच्यासह शहरातील अनेक त्रस्त नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande