
वर्धा, 15 जुलै (हिं.स.)
गोरस भांडार प्रकरणात झालेल्या प्रशासकीय कारवाईमुळे संस्था, शेतकरी, गोपालक, दूध उत्पादक तसेच कर्मचाऱ्यांचे झालेले आर्थिक व सामाजिक नुकसान लक्षात घेऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि संस्थेला झालेल्या नुकसानीची योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
मंडळाचे मंत्री कन्हैया छांगाणी यांनी सांगितले की, गोरस भांडाराची स्थापना महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि सेठ जमनालाल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण स्वावलंबन, गोसंवर्धन आणि शेतकरी हिताच्या उद्देशाने करण्यात आली होती. ही संस्था अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील हजारो शेतकरी, गोपालक आणि दूध उत्पादकांच्या उपजीविकेचा आधार असून गांधीवादी मूल्यांची जिवंत परंपरा आहे. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कारवाईची प्रक्रिया आणि तिची आवश्यकता याबाबत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारवाईदरम्यान कोणत्याही स्तरावर प्रक्रियात्मक त्रुटी, निष्काळजीपणा किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक कठोरता दाखविण्यात आली असल्यास, त्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकारांचा दुरुपयोग, निष्काळजीपणा किंवा अनुचित कारवाई केली असल्यास, कारवाई करण्यात यावी. संस्थेला तसेच तिच्याशी संबंधित शेतकरी, गोपालक, दूध उत्पादक आणि कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
संस्थेचे ५० लाख रुपयांवर नुकसान प्रशासकीय कारवाईदरम्यान सुमारे २६ लाख रुपयांचा माल गाेरस भंडारमधून जप्त करण्यात आला आणि संस्था जवळपास ३८ ते ४० दिवस बंद राहिली. या कालावधीत संस्थेचे ५० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले. तसेच संस्थेशी संबंधित शेकडो शेतकरी, गोपालक, दूध उत्पादक आणि कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा गंभीर परिणाम झाला.
----------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी