अहमदपूर नगरपरिषदेत कचरा टाकून नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन
लातूर, 15 जुलै, (हिं.स.)। प्रभाग क्रमांक ५ मधील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटनेते तथा नगरसेवक अॅड. अजिंक्य भारतराव चामे यांनी अहमदपूर नगरपरिषदेच्या आवारात कचरा टाकून आपले एकदिवसीय ''बैठे आंदोलन'' केले. गेल्या अनेक महिन्
नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन


लातूर, 15 जुलै, (हिं.स.)। प्रभाग क्रमांक ५ मधील प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गटनेते तथा नगरसेवक अॅड. अजिंक्य भारतराव चामे यांनी अहमदपूर नगरपरिषदेच्या आवारात कचरा टाकून आपले एकदिवसीय 'बैठे आंदोलन' केले. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभाग ५ मधील नागरिक कचरा व्यवस्थापन, घंटागाडीची अनियमितता, नालेसफाई आणि पथदिव्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. या समस्यांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने, अखेर नागरिकांच्या वतीने नगर परिषदेत कचरा टाकून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला.

या आंदोलना दरम्यान अॅड. अजिंक्य भारतराव चामे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ धोरणावर जोरदार ताशेरे ओढले. प्रभागातील घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे विस्कळीत झाले असून नियमित घंटागाडी येत नाही. तसेच, नालेसफाई करणारे कर्मचारी उपलब्ध नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. यासोबतच नवीन पथदिवे न बसवणे आणि बंद पथदिव्यांची दुरुस्ती न होणे यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या दुर्लक्षामुळे प्रभागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून दुर्गंधी व रोगराईचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषदेसमोर करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाने तातडीने घनकचरा व्यवस्थापन सुरळीत करावे, नियमित घंटागाडी सुरू करावी, नालेसफाई करून पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा मागण्या अॅड. चामे यांनी लावून धरल्या आहेत. जनतेच्या या मूलभूत प्रश्नांची तात्काळ सोडवणूक न झाल्यास, भविष्यात यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अॅड. अजिंक्य भारतराव चामे यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande