लातूरमध्ये कचोरीत दात आढळल्याचा ग्राहकाचा दावा; व्हिडिओ व्हायरल
लातूर, 15 जुलै (हिं.स.)। लातूर शहरातील एका कचोरी सेंटरमधून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये मानवी दातासारखी वस्तू आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, संबंधित ग्राहकाने अन्न व औषध प
कचोरीत दात


लातूर, 15 जुलै (हिं.स.)। लातूर शहरातील एका कचोरी सेंटरमधून खरेदी केलेल्या कचोरीमध्ये मानवी दातासारखी वस्तू आढळल्याचा गंभीर आरोप एका ग्राहकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, संबंधित ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने कचोरी सेंटरमधून कचोरी खरेदी केली होती. कचोरी खात असताना त्यामध्ये दातासारखी वस्तू आढळल्याचा दावा ग्राहकाने केला. यानंतर त्यांनी त्या वस्तूचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ग्राहकाने संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाबाबत कचोरी सेंटरची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच कचोरीमध्ये आढळलेली वस्तू प्रत्यक्षात मानवी दातच आहे की अन्य काही, याबाबत अधिकृत प्रयोगशाळा तपासणी नंतरचं समोर येणार आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande