
सोलापूर, 15 जुलै (हिं.स.)।
सोलापूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने संकटात सापडलेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. उजनी धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि जलसुरक्षेच्या प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि मंगळवेढा तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांची खरीप पिके पावसाअभावी धोक्यात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
उजनीतून भीमा नदीपात्र, उजवा व डावा कालवा तसेच बोगद्याद्वारे सीना नदीत तातडीने पाणी सोडण्याची मागणी शिंदे यांनी केली. नदीपात्रात तांत्रिक कारणांमुळे सध्या पाणी सोडणे शक्य नसले तरी उजनीच्या दोन्ही कालव्यांतून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतूनही तातडीने पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे भोसे, हुलजंती, शिरनांदगी, मारोळी, सलगर बुद्रुक व खुर्द, लवंगी, येळगी, सोड्डी, शिवणगी, आसबेवाडी आदी दुष्काळी भागातील गावांना दिलासा मिळणार आहे.
भीमेवरील बंधारे होणार बॅरेज
सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवरील विद्यमान बंधाऱ्यांचे आधुनिक बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीवरही जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सर्व बंधाऱ्यांचे तातडीने सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणानंतर बॅरेज उभारणीसाठी राज्य शासन आवश्यक निधी देणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले.
तारापूर येथे नव्या बंधाऱ्यासाठी कार्यवाही
पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भीमा नदीवर नवीन बंधारा उभारण्याच्या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. या बंधाऱ्यामुळे तारापूर, फुलचिंचोली, सुस्ते, मंगरवाडी, चळे, आंबे, बिटरगावसह परिसरातील गावांची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
मुख्य अभियंता कार्यालय आता सोलापुरात
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कार्यालय पुण्याहून सोलापुरात स्थलांतरित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. २४ जुलै रोजी सोलापुरात या कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या पाणी प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देऊन सोलापूर जिल्ह्याच्या दीर्घकालीन सिंचन विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, जकराया शुगरचे अध्यक्ष बिराप्पा जाधव, प्रशांत साळे, राहुल घुले, युवराज गडदे, अमोल रणदिवे, सीताराम रणदिवे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड