
अमरावती, 15 जुलै (हिं.स.)
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील आरोग्यसेवांवर विशेष लक्ष केंद्रित करीत अकोला विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांनी गेल्या पंधरा दिवसांत तीन वेळा दौरे करून विविध आरोग्यकेंद्रांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी आरोग्यकेंद्रांतील सेवा, कर्मचारी उपस्थिती आणि आरोग्य सुविधांची तपासणी केली. काही ठिकाणी कामकाजाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले, तर काही ठिकाणी सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पावसाळ्यात मेळघाटात साथीचे आजार आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्ययंत्रणा अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आरोग्यकेंद्रांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. त्यानुसार डॉ. वाकचौरे यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता विविध आरोग्यकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. काही दिवसांपूर्वी चिखलदरा येथील शालेय आरोग्यतपासणी पथकातील दोन डॉक्टर तसेच नवजात शिशू रुग्णवाहिकेवरील एका डॉक्टराविरुद्ध झालेल्या कारवाईतही वरिष्ठ स्तरावरून पुढाकार घेण्यात आला होता. त्यानंतर आरोग्यकेंद्रांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अधिक सतर्कता आल्याचे बोलले जात आहे. १4 जुलै रोजीच्या दौऱ्यात डॉ. वाकचौरे यांनी चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्यकेंद्रांना भेटी देऊन आरोग्यसेवा, औषधसाठा, कर्मचारी उपस्थिती व रुग्णसेवेचा आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले, धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप हेडाऊ तसेच धारणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तिलोत्तमा वानखडे उपस्थित होत्या.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी