
यवतमाळ, 15 जुलै (हिं.स.)। मारेगाव तालुक्यातील मार्डी-हिवरा मार्गावरील बंधारा पुलाची दुरवस्था झाल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पुलाची दुरुस्ती न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना उबाठाचे मारेगाव तालुका प्रमुख तथा माजी उपसरपंच पुरुषोत्तम बुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिला आहे.
मार्डी-हिवरा मार्गावरील हा बंधारा पूल अनेक वर्षांपासून समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. पुलाच्या बांधकामातील त्रुटींमुळे पुलावर मोठा उंचवटा निर्माण झाला.शेतकऱ्यांना शेतातील उपकॅनलकडे जाण्यासाठीही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम बुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात कोणतीही जीवितहानी अथवा गंभीर अपघात झाल्यास त्यास संबंधित विभाग व अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत राहून ही अंतिम चेतावणी देण्यात आली असून, प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे पुरुषोत्तम बुटे यांनी स्पष्ट केले आहे.पावसामुळे पुलालगत चिखलयुक्त खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा दुचाकी घसरून अपघात घडत असून, काही नागरिकांना दुखापती झाल्याची माहिती आहे. हा मार्ग शेतकरी, विद्यार्थी, नागरिक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र पुलाची दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी