
बीड, 15 जुलै (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथील तरुण ज्ञानेश्वर वाकडे याची घाटनांदूर येथे चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या हत्याप्रकरणी सात जणांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, मुख्य संशयित असलेल्या सरपंच यांनी अटकपूर्व जामिनासाठी अंबाजोगाई न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
न्यायालयाने या अर्जावर पीडित कुटुंबीयांना आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. हत्येनंतर आरोपी सरपंच गारठे यांच्या मालकीच्या मंगल कार्यालयात लपले होते. सरपंचानेच आरोपींना आश्रय देऊन पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप वाकडे कुटुंबीयांनी केला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि सरपंचाला सहआरोपी करण्यासाठी शोकाकुल कुटुंबीयांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर तब्बल बारा तास ठिय्या आंदोलन केले होते. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्तीमुळे एका निरापराध तरुणाचा जीव गेला असून, सरपंचाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी, अशी आर्त मागणी कुटुंबीयांनी पुन्हा केली आहे. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचे धाडस नागरिकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis