
नैसर्गिक आपत्ती व सांडपाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक वाहनाचे लोकार्पण
नाशिक, 15 जुलै, (हिं.स.)। जिल्ह्यातील नागरी भागांमध्ये आपत्ती व सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितींना जलद आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी अत्याधुनिक आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता वाहन (Emergency Response Sanitation Unit - ERSU) जिल्हावासीयांच्या सेवेत दाखल झाले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या वाहनाचे लोकार्पण आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झाले.
लोकार्पण कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, नगरपालिका शाखेचे सहाय्यक आयुक्त शाम गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या अत्याधुनिक ईआरएसयू वाहनामध्ये उच्च क्षमतेची जेटिंग प्रणाली, सक्शन यंत्रणा, पॉवर रॉडिंग मशीन, उच्च क्षमतेचा डायव्हर्टिंग पंप, गॅस डिटेक्टर, जनरेटर, विंच, सीसीटीव्ही कॅमेरा, मॅनहोल तपासणीसाठी आवश्यक उपकरणे, बचाव व आपत्कालीन साहित्य तसेच वैयक्तिक सुरक्षा साधनांसह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. या वाहनाच्या माध्यमातून सीवर लाईनमधील अडथळे दूर करणे, सांडपाणी व्यवस्थेतील बिघाडांवर तातडीने उपाययोजना करणे तसेच मनुष्यबळाचा धोका कमी करून सुरक्षित व कार्यक्षम सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींना सांडपाणी व्यवस्थापनातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये तांत्रिक सहाय्य मिळणार असून, स्वच्छता व्यवस्थेची कार्यक्षमता अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे प्राधान्य दिले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV